Type Here to Get Search Results !

भुत्याने येथे 'एकल महिला मेळावा' उत्साहात संपन्न; महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प

सदगुरू रक्षा न्युजः सुनिल आण्णा सोनवणे
चांदवड: एकल महिलांना समाजात सन्मानाचे स्थान मिळावे आणि त्यांना मुख्य प्रवाहात सामील करून घेता यावे, या उद्देशाने नाशिक जिल्ह्यातील भुत्याने ग्रामपंचायत येथे 'एकल महिला मेळाव्याचे' शानदार आयोजन करण्यात आले होते. महिला ग्रामसेवेच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
​नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून आणि गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा विशेष उपक्रम राबवण्यात आला. समाजातील एकल महिलांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधणे आणि त्यांना आधार देणे हा यामागचा मुख्य हेतू होता.

​या मेळाव्यासाठी गावच्या सरपंच सौ. छाया बाबुराव चिंचोले आणि उपसरपंच सौ. वैशाली शरद पवार प्रामुख्याने उपस्थित होत्या. यावेळी बोलताना सरपंच छाया चिंचोले म्हणाल्या की, "एकल महिलांना सन्मानाने जगता यावे यासाठी गावपातळीवर सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे ही आपली सर्वांची जबाबदारीआहे."

​कार्यक्रमाचे औचित्य साधून उमेद अभियानातील सप्तशृंगी महिला ग्राम संघाच्या अध्यक्ष, सचिव आणि विविध बचत गटातील महिलांनी एकत्र येत 'हळदी-कुंकू' कार्यक्रम साजरा केला. पारंपारिक पद्धतीने आणि हसत-खेळत पार पडलेल्या या कार्यक्रमाने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
​या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, ग्रामसखी, आशाताई, अंगणवाडी सेविका आणि ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप करताना ग्रामपंचायत सदस्य मनीषा आहेर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.

Post a Comment

0 Comments