चांदवड:- श्री नेमिनाथ जैन विद्यालयात 21 मार्च आंतरराष्ट्रीय वन दिन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांनी दिली.
विद्यालयातील हरित सेना विभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग चांदवड यांच्या संयुक्त विद्यमाने श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अण्णा लोखंडे, विजय लोखंडे, अश्विनी सोमवंशी वनरक्षक सामाजिक वनीकरण विभाग चांदवड यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्ष संवर्धनाचा संकल्प करीत आंतरराष्ट्रीय वन दिन साजरा करण्यात आला.
झाडे आणि मानव यांचा पर्यावरणातील घटक म्हणून सरळ सहसंबंध आहे. या उद्देशाने 28 नोव्हेंबर 2012 रोजी सर्वप्रथम संयुक्त राष्ट्र संघाने 21 मार्च हा दिवस दरवर्षी जागतिक वन दिन म्हणून साजरा व्हावा असे सूचित केले. त्या नंतर 21 मार्च 2013 हा पहिला आंतरराष्ट्रीय वन दिन म्हणून साजरा केला गेला.
या दिवसाचे महत्त्व विशद करताना विद्यालयाचे हरित सेना प्रमुख रोशन नेरकर यांनी जागतिक तापमान वाढ त्यामुळे सातत्याने ढासळणारे हिमनग, वाढते प्रदूषण, लोप पावत जाणारी जैवविविधता, वन्य प्राण्यांचे मानवी वस्त्यांमध्ये शिरकाव अशा जागतिक आणि प्रादेशिक समस्या आज माणसाला सातत्याने भेडसावत आहेत. व त्याचे प्रमाण देखील वाढत आहे. या सर्व आपत्तींना दूर करून माणसाला जर आरोग्यदायी आणि समृद्ध जीवन जगायचे असेल तर आपण वृक्षारोपण आणि संवर्धन केले पाहिजे. झाडे लावल्याने आपल्याला प्राणवायू, फळे, फुले, सावली, पशु पक्षांना निवारा अशा मानवाला आवश्यक अनेक गोष्टी प्राप्त होत असतात. आणि ते देखील मोफतच....
म्हणून आपण पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास रोखण्यासाठी व आपले जीवन सुखी आणि समृद्ध करण्यासाठी जास्तीत जास्त वृक्षारोपण, संवर्धन आणि जतन करून धरणी मातेला सुजलाम सुफलाम करण्याचा संकल्प आपल्या मनोगतातून व्यक्त केला. आपण आपल्या परिवारातील कोणत्याही सदस्याचा वाढदिवस किंवा आपल्या जीवनातील सुखकर क्षणांचा आनंद व्यक्त करतांना झाड लावले पाहिजे आणि त्याची निगा राखली पाहिजे. असा महत्वपूर्ण संदेश आपल्या भाषणातून उपस्थितांना दिला.
कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी विजय लोखंडे यांनी झाडांकडून होणारे विविध पर्यावरण विषयक फायदे सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व विद्यालयाचे उपप्राचार्य देवेंद्र राज जैन यांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपण व संवर्धन याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन होण्यासाठी विद्यालयाचे पर्यवेक्षक रामचंद्र पाटील यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन विद्यालयातील हरित सेना प्रमुख रोशन नेरकर यांनी केले.
विद्यालयाच्या या पर्यावरण पूरक कार्यक्रमाचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, उपाध्यक्ष अरविंद भन्साळी, मानद सचिव जवाहरलाल आबड, विद्यालयाचे समन्वयक शांतीलाल अलिझाड, महावीर पारख, झुंबरलाल भंडारी, महेंद्र पारख यांनी कौतुक केले.
Post a Comment
0 Comments