Type Here to Get Search Results !

पुणेगाव दरसवाडी कालव्याचे कॉंक्रीटीकरण शेतकऱ्यांनी पाडले बंद

सदगुरू रक्षा न्युज : सुनिल आण्णा सोनवणे,चांदवड
चांदवडः  चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान असलेल्या पुणेगाव दरसवाडी पोहच कालव्याचे संपूर्ण कॉंक्रीटीकरण करून पाणी येवल्या तालुक्याला पळवून नेण्याचा घाट घातला जात आहे. कॉंक्रीटीकरणामुळे पाणी जमिनीत न मुरता ते वाहून जाणार आहे. याचा काही एक फायदा तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार नाही आहे. यामुळे वडनेरभैरव येथील शेतकऱ्यांनी संतप्त होत पुणेगाव दरसवाडी पोहच कालव्याचे कॉंक्रीटीकरणाचे कामकाज बुधवार (दि.५) रोजी बंद पाडले.
चांदवड तालुक्यासाठी खऱ्या अर्थाने पुणेगाव दरसवाडी पोहच कालव्याची निर्मिती करण्यात आली. या कालव्यामुळे तालुक्यातील शेतीचे क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याने शेतकऱ्यांनी आप आपल्या जमिनी कालव्याच्या निर्मितीसाठी दिल्या. हे वास्तव आहे. गेल्या ४० वर्षापासून कालव्याच्या पाण्यासाठी शेतकरी आतुरतेने वाट पाहात होते. आज कालव्याचे पाणी दरसवाडी धरणात व तेथून तळेगावरोही मार्गे येवला तालुक्यातील डोंगरगावपर्यंत नेण्यात आले आहे. या कालव्याचे अर्धे कॉंक्रीटीकरण झाले असून उर्वरित काम सुरु आहे. सध्या, तालुक्यातील वडनेरभैरव गावच्या परिसरात कालव्याचे कॉंक्रीटीकरण केले जात आहे. या कॉंक्रीटीकरणास शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. आज कालव्याचे पाणी झिरपून जमिनीत मुरत आहे. यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढून पाणी दीर्घ काळ टिकते. हा नैसर्गीक फार्म्युला आहे. मात्र कालव्याचे पाणी येवला तालुक्यात पळवून नेण्यासाठी प्रशासनाद्वारे घाट घातला जात आहे. यास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. ज्या ठिकाणी कालव्याच्या पाण्यामुळे जमिनी उपळत असतील अशा ठिकाणीच कालव्याचे कॉंक्रीटीकरण करण्याची शेतकऱ्यांची मागणी होती. मात्र शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार न करता कालव्याचे सरसकट कॉंक्रीटीकरण केले जात असल्याने त्यास शेतकऱ्यांनी विरोध करीत काम बंद पाडले. हे पाणी एक्सप्रेस कालव्या सारखे नेण्याचे शासनाचे धोरण आहे कां? पुरपाण्यासाठी सदरचा पाट निर्माण केला परंतु सरसकट कॉक्रीटीकरण कशासाठी ? असा संतप्त प्रश्चच शेतकऱ्यांनी यावेळी येथील अधिकाऱ्यांना केला.
यावेळी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संपतराव वक्ते, सरपंच रावसाहेब भालेराव, बाळासाहेब तिडके, संजय तिडके, बाळासाहेब जाधव, रमेश जाधव, कारभारी तिडके, गणेश तिडके, नाना सलादे, पाटबंधारे विभागाच्या उपकार्यकारी अभियंता योगिता घुगे, पोलीस निरीक्षक मृदुला नाईक, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, नायब तहसीलदार विजय कचवे, मंडळ अधिकारी गणेश शिरसाठ आदी उपस्थित होते.
पुणेगाव दरसवाडी पोहच कालव्याच्या निर्मिती वेळी शेतकऱ्यांना पाण्याचे स्वप्न दाखवले गेले. त्यामुळे शेतकऱ्यांनी कवडीमोल दराने आपल्या जमिनी कालव्यासाठी दिल्या. मात्र आज या कालव्याचे कॉंक्रीटीकरण करून पाणी पळवून नेण्याचा घाट घातला जात आहे. कॉंक्रीटीकरणामुळे एक थेंब देखील पाणी जमिनीत मुरणार नसल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कालव्याचे कामकाज बंद पाडले आहे. – संपतराव वक्ते,
 तालुकाध्यक्ष, कॉंग्रेस पक्ष.
-------------++++---------------------------++++-------
 पुणेगाव दरसवाडी कालव्याचे पाणी ज्या ठिकाणी लिकेज असेल अशा ठिकाणीच कालव्याचे अस्तरीकरण करणे गरजेचे आहे. असे केल्यास कालव्याचे पाणी जमिनीत मुरून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. असे करण्याऐवजी मात्र सबंधित विभागाद्वारे संपूर्ण कालव्याचे कॉंक्रीटीकरण करून पाणी पळवून नेण्यात येत आहे. असे झाल्यास या कालव्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार नाही. सबंधित विभागाने ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्याच ठिकाणी अस्तरीकरण करावे अन्यथा काम करू दिले जाणार नाही. पाणी पुढे नेण्यास आमची कुठला हि विरोध नाही. मात्र आमच्या हक्काचे पाणी आम्हाला मिळणे आवश्यक आहे.–
 रावसाहेब भालेराव, सरपंच, वडनेरभैरव.

Post a Comment

0 Comments