चांदवड : नगरपरिषदने,शहरातील मेनरोड - मातीच्या गणपती मंदिरापासुन ते बाजारवेश पर्यंतच्या रस्त्याचे नित्कृष्ट दर्जाचे काम व बाजारवेशेच्या पुढच्या रस्त्याचे काम अर्धवट सोडल्याबाबतचांदवड पण येथील प्रांताधिकारी व नगरपरिषद यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे निवेदन देण्यात आले.
चांदवड शहरातील मेनरोड मातीच्या गणपती मंदिरापासुन ते बाजारवेश पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटिकरणाचे काम मागील 3 - 4 महिन्यांपुर्वी करण्यात आलेले होते. परंतु, या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे व ओबडधोबड करण्यात आलेले असून 3 - 4 महिन्यांतच या रस्त्यातील खडी वर येत आहे. यामुळे रस्त्यावरुन चालताना दुचाकी वाहने घसरुन वाहन चालक खाली पडतात व जखमी होतात. सोमवार पेठेतील हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असल्याने नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांच्या संगनमताने ठेकेदाराने या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करुन हे काम अर्धवटच सोडलेले आहे. या रस्त्याच्या जमिनीलगतचा कार्पेट लेअर कचमध्ये करण्यात आलेला आहे. या ठेकेदाराने रस्त्याच्या मधोमध मोठ - मोठे अतिशय धोकादायक असे गटाराचे चेंबर बांधलेले आहेत. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात अपघात देखील वाढलेले आहेत. पायी चालणारे लोक व दुचाकीस्वारांना या चेंबरचा अंदाज येत नसल्याने हे लोक चेंबरवर आदळतात व लोकांचे हात - पाय फ्रॅक्चर होतात व ते किरकोळ जखमी होतात. रात्री - अपरात्री सुद्धा चारचाकी वाहने या चेंबरवर येवून आदळत असल्याने वाहनांचेही मोठ्या प्रमाणान नुकसान होते. तसेच शहरातील नळांना जेव्हा पाणी येते तेव्हा या रस्त्यावर जागोजागी पाणी साचते. रस्त्यावर साचलेल्या पाण्यातुन नागरिकांना वाट काढत चालावे लागते. पूर्वी या रस्त्याच्या दोन्ही कडांना गटार होत्या. या ठेकेदाराने या दोन्ही कडांच्या गटार कायमस्वरुपी बुजवुन टाकल्याने येथील सांडपाणी जायला जागा नाही. येथे सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे. यामुळे मेनरोडच्या सर्व रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. या रस्त्याचे काम चालु असताना येथील रहिवाशांनी या रस्त्याचे काम करणाऱ्या इंजिनीअर व ठेकेदारांना या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत विचारणा केल्यावर या इंजिनीअर व ठेकेदारांनी या लोकांवर दादागिरी व दडपशाही केली व जनतेला न जुमानता त्यांनी आपल्या मनमानी कारभाराने या रस्त्याचे काम कच्च्या दर्जाचे केले.
या रस्त्याचे काम इन्स्ट्रुमेंट प्रमाणे करण्यात आलेले नाही. या रस्त्याचे बांधकाम करुन 3 - 4 महिनेच झाले असताना हा रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहे. तसेच बाजारवेशेच्या पुढच्या रस्त्याचे काम तर अर्धवटच सोडण्यात आलेले आहे. यावरुनच कळते की, या रस्त्याचे काम फक्त आणि फक्त विकासकामांचा निधी हडपण्यासाठीच नगरपरिषद मुख्याधिकारी व त्यांच्या संगनमताच्या ठेकेदारांकडुन करण्यात आलेले आहे. या रस्त्याचे काम इतक्या निकृष्ट दर्जाच्या असुनसुद्धा मुख्याधिकारी बेजबाबदारपणे वागत आहेत. मुख्याधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच शहरात असे खराब रस्ते तयार केले जात आहेत. यावर्षी जर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असता तर हा रस्ता पावसाच्या पाण्यात वाहून गेला असता. या रस्त्याच्या कामात स्टील व वाळु देखील वापरण्यात आलेले नाही. रस्त्याचे संपूर्ण काम कच मध्ये करण्यात आलेले आहे. हा रस्ता निकृष्ट दर्जाचा बांधल्याने याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. यामुळे शहरातील नागरिकांत अत्यंत संतप्तेचे वातावरण निर्माण झालेले आहे.
या रस्त्याच्या कामासाठी शासनाकडून किती निधी मंजूर करण्यात आला व किती निधी या रस्त्याच्या कामात वापरण्यात आला हे शहरातील जनतेला तपशीलवार कळविण्यात यावे. तसेच या रस्त्याची गुणवत्ता चाचणी करण्यात यावी. विकासकामांचे जेव्हा टेंडर निघते तेव्हा संबंधित कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट देताना 'हे काम किती वर्ष टिकेल दहा वर्षे की वीस वर्षे टिकेल', असे कॉन्ट्रॅक्टरकडून हमीपत्रात लिहून घेतले जाते. पण हा रस्ता फक्त तीन - चार महिन्यांतच उद्ध्वस्त झाला यावरुनच असे लक्षात येते की, येथे कॉन्ट्रॅक्टर कडून हमीपत्रही लिहून घेण्यात आलेले नाही. रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर व नगरपरिषद अधिकाऱ्यांनी संगनमताने या रस्त्याच्या कामाचा निधी लाटला आहे. येथील रहिवाशांनी नगरपरिषदेला अनेक वेळा या रस्त्याच्या कामाबाबत तक्रारी अर्ज दिले. परंतु, नगरपरिषदेकडून या लोकांना उडवा - उडवीची उत्तरे देण्यात आली व त्यांच्या समस्येकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आले. रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला शासनाने महाराष्ट्रासह इतरत्र । कोठेच कोणतेही काम देण्यात येवु नये व याचे लायसन्स रद्द करुन याचे नाव ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात यावे.
लवकरात - लवकर या रस्त्याचे काम इन्स्ट्रुमेंट प्रमाणे व पक्क्या दर्जाचे करण्यात यावे. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ), नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्या वतीने नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण व तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल. यानंतर कायदा सुव्यवस्थतेचा प्रश्न निर्माण होऊन घडणाऱ्या परिस्थितीस आपण सर्वस्वी जबाबदार राहाल, याची नोंद शासनाने घ्यावी.
चांदवड शहरातील गणपती मंदिरापासून ते बाजारवेश पर्यंतच्या रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम व बाजारवेशेच्या पुढच्या रस्त्याचे काम अर्धवट सोडल्याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ), नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्या वतीने दि. 22 फेब्रुवारी 2024 रोजी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सर्व महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments