चांदवड (प्रतिनिधी): "स्त्री म्हणजे केवळ घराचा आधार नाही, तर ती संपूर्ण समाजाच्या प्रगतीचा कणा आहे..." या भावनेचा प्रत्यय आज चांदवड शहरात प्रकर्षाने आला. जागतिक महिला दिनानिमित्त चांदवड नगर परिषदेच्या महिला व बालविकास समिती सभापती तथा लोकप्रिय नगरसेविका सौ. सरलाताई मिस्त्रीलाल अग्रवाल यांच्या वतीने आयोजित 'महिला सन्मान सोहळा' केवळ एक कार्यक्रम ठरला नाही, तर तो हजारो माता-भगिनींच्या आनंदाचा आणि अभिमानाचा उत्सव ठरला.
सकाळपासूनच रेणुका लॉनचा परिसर रंगीबेरंगी साड्या आणि महिलांच्या उत्साही चेहऱ्यांनी उजळून निघाला होता. चांदवड शहरातील कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो महिलांची उपस्थिती ही नगरसेविका सरलाताई अग्रवाल यांच्यावरील विश्वासाची आणि त्यांच्या कार्याची पावतीच होती. इतक्या मोठ्या प्रमाणावर महिला वर्ग एकत्र येण्याची ही अलिकडच्या काळातील पहिलीच वेळ असावी, अशी चर्चा उपस्थित महिला वर्गामध्ये रंगली होती.
या सोहळ्याचे प्रमुख अतिथी नगराध्यक्ष वैभवजी बागुल यांनी आपल्या भाषणात महिलांच्या संघर्षाला आणि कर्तृत्वाला सलाम केला. ते म्हणाले की, "आज सरलाताईंनी ज्या मायेने आणि आपुलकीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, ते पाहून मन भरून आले. चांदवडच्या विकासात महिला भगिनींचे योगदान अतुलनीय . आहे आणि नगर परिषद सदैव तुमच्या प्रगतीसाठी कटिबद्ध आहे."
कार्यक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे अतिशय देखणे आणि नियोजनबद्ध आयोजन. प्रत्येक भगिनीचे स्वागत, बसण्याची सुयोग्य व्यवस्था आणि संपूर्ण कार्यक्रमात जपलेला आदरभाव यामुळे सरलाताई अग्रवाल यांच्या नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. महिलांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि त्यांच्या डोळ्यातील आत्मविश्वास हाच या कार्यक्रमाचा खरा विजय असल्याचे यावेळी जाणवले.
कार्यक्रमाच्या शेवटी जेव्हा हजारो महिलांनी एकसुरात महिला शक्तीचा जयघोष केला, तेव्हा संपूर्ण रेणुका लॉन परिसर चैतन्याने न्हाऊन निघाला होता. सरलाताई अग्रवाल यांच्या या 'हृदयस्पर्शी' उपक्रमाने चांदवडच्या सामाजिक इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे.सदरच्या कार्यक्रमासाठी चांदवड शहरातील सर्वच नगरसेविका त्याचप्रमाणे नगर परिषदेतील महिला कर्मचारी,महिला पत्रकार व चांदवडच्या सर्वच क्षेत्रातील ऑफिस मधील महिला कर्मचारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या
Post a Comment
0 Comments