Type Here to Get Search Results !

नवापूर येथे सत्यशोधक महिला मेळावा संपन्न; १५ ठराव मंजूर, अंमलबजावणी न झाल्यास आंदोलनाचा इशारा...

सदगुरू रक्षा न्युज : सुनिल आण्णा सोनवणे
नवापूर (जि. नंदुरबार) : नवापूर येथील भाजी मार्केट कमिटीच्या हॉलमध्ये सत्यशोधक महिला सभेच्या वतीने भव्य सत्यशोधक महिला मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात महिलांच्या व आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर १५ ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. प्रशासनाने या ठरावांची तात्काळ अंमलबजावणी करावी, अन्यथा महिलांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
मेळाव्याची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले रचित “सत्याचा अखंड” गायनाने झाली. त्यानंतर महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सत्यशोधक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या होमाबाई गावीत व शांताबाई गावीत यांचा आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेले (लुगडं`) देऊन सत्कार करण्यात आला.
या मेळाव्यात प्रमुख वक्त्या म्हणून सुशिला मावळी (साक्री), कॉम. शीतल गावीत (सत्यशोधक महिला अध्यक्ष), कॉम. गेवाबाई गावीत तसेच ज्येष्ठ नेत्या होमाबाई गावीत यांनी महिलांना मार्गदर्शन केले. विचारमंचावर कॉम. मनिला गावीत, रंगुबाई मावची, कल्पना गावीत आदी उपस्थित होत्या.
मेळाव्यात मंजूर ठरावांमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये आदिवासी विद्यार्थिनींवर होणाऱ्या अन्याय-अत्याचारांची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी महिला अधिकारी व तक्रार निवारण यंत्रणा उभारावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच नवापूर, चिंचपाडा, विसरवाडी व खांडबारा परिसर गांजामुक्त करावा व अमली पदार्थ विक्रीवर कठोर कारवाई करावी, युवक व विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती जनजागृती मोहिमा राबवाव्यात, असे ठराव करण्यात आले.
याशिवाय आदिवासी महिलांना कसत असलेल्या जमिनीचा ७/१२ उतारा देणे, वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, आदिवासी समाजासाठी स्वतंत्र आदिवासी कोड तयार करणे, महिलांमधील कुपोषण व रक्तक्षय कमी करण्यासाठी विशेष योजना राबवणे, दुर्गम भागात आरोग्य सेवा वाढवणे, आदिवासी मुलींच्या शिक्षणासाठी सुविधा वाढवणे, जंगलावर आधारित उपजीविकेसाठी बाजारपेठ उपलब्ध करणे, शेतमालाला हमीभाव देणे, कामगार महिलांच्या हक्कांचे संरक्षण करणे व समान कामाला समान वेतनाची अंमलबजावणी करणे आदी मागण्या करण्यात आल्या.
तसेच गरोदर माता व आपत्कालीन रुग्णांच्या जीविताच्या सुरक्षेसाठी गावातील व परिसरातील खराब रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करून पक्के (डांबरी/सिमेंट काँक्रीट) रस्ते तयार करावेत, ज्या ठिकाणी रस्ते नाहीत तेथे नवीन रस्ते मंजूर करून बांधकाम सुरू करावे व त्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, असा ठरावही मंजूर करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात कॉम. शीतल गावीत यांनी ठरावांचे वाचन केले. उपस्थित महिलांनी हात वर करून ठरावांना एकमताने मंजुरी दिली.
कार्यक्रमात हजारो महिलांनी सहभाग घेत “बायऱ्या बायऱ्या लढणाऱ्या – नव निर्माण करणाऱ्या”, “लढेंगे – जितेंगे”, “जमीन आमची हक्काची”, “आई सावित्रीबाई फुलेचा विजय असो”, “आई देवमोगरा माता की जय” अशा घोषणा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉम. आर. टी. गावीत, राजेश गावीत, गोबजी गावीत, रंजीत गावीत, जल्मसिंग गावीत, दिवाणजी नाईक, सुनील गावीत रामदास गावीत, रंगुबाई मावची सुकऱ्या गावीत, बाल्या गावीत आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments