चांदवडः नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आज एक मोठी कारवाई करत जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या (चांदवड) उपविभागीय अभियंत्याला ३ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या प्रकरणातील दुसरा आरोपी शाखा अभियंता मात्र फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
सदरच्या प्रकरणात तक्रारदार हे जिल्हा परिषद बांधकाम विभागात नोंदणीकृत कंत्राटदार आहेत. त्यांनी चांदवड तालुक्यातील 'तालुक हद्द ते बच्छाव वस्ती-उसवाड-कळमदरे' या रस्त्याच्या सुधारणा आणि डांबरीकरणाचे काम पूर्ण केले होते. या कामाचे अंदाजे ९० लाख रुपयांचे कंत्राट त्यांना मिळाले होते. आतापर्यंत त्यांना ४१ लाख रुपये मिळाले असून, उर्वरित १० लाख रुपयांचे बिल मंजूर होणे बाकी होते.
हे प्रलंबित बिल मंजूर करण्यासाठी आणि यापूर्वी मिळालेल्या बिलाच्या मोबदल्यात 'बक्षीस' म्हणून दोन अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केली होती यात विठ्ठल बालाजी पठाडे (वय ५६, उपविभागीय अभियंता, वर्ग-१) - ३,००,०००/- रुपये व कृष्णकांत जिभाऊ देवरे (वय २८, शाखा अभियंता, वर्ग-२) - २,६७,०००/- रुपये मागणी केली होती पण तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी ३० मार्च २०२६ रोजी नाशिक एसीबीकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, आज दुपारी ४:४५ वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद नाशिकच्या कार्यालयात सापळा रचण्यात आला. उपविभागीय अभियंता विठ्ठल पठाडे यांनी तक्रारदाराकडून ३ लाख रुपये स्वीकारले. यामध्ये १ लाख रुपयांच्या खऱ्या नोटा आणि २ लाख रुपयांच्या डमी नोटांचा समावेश होता. पैसे स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.तर दुसरे आरोपी शाखा अभियंता कृष्णकांत देवरे यांनी स्वतःच्या राहत्या घरी २,६७,०००/- रुपयांची मागणी केली होती, परंतु कारवाईची कुणकुण लागताच ते फरार झाले आहेत.या प्रकरणी भद्रकाली पोलीस स्टेशन, नाशिक शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७ आणि १२ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक युनिटचे पोलीस निरीक्षक श्री. अमोल सदाशिव वालझाडे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
शासकीय कामासाठी कोणीही लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments