चांदवड : बदलत्या काळानुसार समाजाने आपली जुनी आणि अनिष्ट विचारधारा बदलणे गरजेचे आहे, हेच काजीसांगवी (ता. चांदवड) ग्रामपंचायतीने कृतीतून दाखवून दिले आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत खरेदी करण्यात आलेल्या नवीन घंटागाडीचे पूजन समाजातील 'एकल आणि विधवा' महिलांच्या हस्ते करून एका नव्या आणि पुरोगामी परंपरेचा श्रीगणेशा करण्यात आला. नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ओमकार पवार यांनी एकल, विधवा आणि परितक्त्या महिलांना समाजात इतर महिलांप्रमाणेच सन्मानाचे स्थान मिळावे, अशी संकल्पना मांडली आहे. या संकल्पनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी काजीसांगवी ग्रामपंचायतीने केली. जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ आणि चांदवडचे गट विकास अधिकारी मच्छिंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला.
गावातील श्रीमती कल्पना साहेबराव सोनवणे आणि श्रीमती शोभा अशोक ठाकरे या विधवा महिलांच्या शुभहस्ते नवीन घंटागाडीचे शास्त्रोक्त पूजन करण्यात आले. एरवी शुभ कार्यातून बाजूला सारल्या जाणाऱ्या या भगिनींना ग्रामपंचायतीने मुख्य प्रवाहात आणून मानाचे स्थान दिल्याबद्दल संपूर्ण तालुक्यात या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
याच कार्यक्रमात आमदार डॉ. राहुलजी आहेर यांच्या निधीतून मंजूर झालेल्या सार्वजनिक सभामंडपाचे भूमिपूजनही उत्साहात पार पडले. यामुळे गावातील सार्वजनिक कार्यक्रमांची मोठी अडचण दूर होणार आहे. या प्रसंगी सरपंच श्रीमती कल्पना सुरेश ठाकरे, ग्रामपंचायत अधिकारी सुनिल किसन सहाणे, नवनिर्वाचित उपसरपंच जनार्दन बाळासाहेब ठाकरे, माजी उपसरपंच सुशीला केशव सोनवणे, सदस्या वनिता विलास सोनवणे, सुनिल बाळकृष्ण ठाकरे, तसेच सुरेश ठाकरे, प्रभाकर सोनवणे, छबू मेचकुल, माणिक ठाकरे, वैभव ठाकरे, सचिन ठाकरे, बापू ठाकरे आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
"केवळ रस्ते आणि गटारी म्हणजे विकास नव्हे, तर समाजातील शेवटच्या घटकाला सन्मान देणे हाच खरा विकास आहे, हे आज काजीसांगवीने सिद्ध केले आहे--- सुनिल सहाणे ग्रामसेवक, काजीसांगवी
Post a Comment
0 Comments