Type Here to Get Search Results !

शिंगवे गावातील शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी भिंती झाल्या बोलक्या

सदगुरू रक्षा न्युज प्रतिनिधी चांदवड
चांदवड : तालुक्यातील शिंगवे गावात प्रथम एज्युकेशन फाउंडेशन व डॉ. चंद्रशेखर परदेशी (धोंडगव्हाण) यांच्या संयुक्त विद्यमानाने “आमचे गाव” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून तालुक्यातील मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. चांदवड तालुक्यातील एकूण 115 गावे व वस्त्यांमध्ये हे शैक्षणिक कार्य सुरू आहे. शिक्षण हे केवळ शाळेच्या चार भिंतींत मर्यादित न ठेवता, ते घराघरांत, रस्त्यांवर आणि गावाच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचावे, या उद्देशाने गृहभेटी, माता सभा, रॅली, मेळावे अशा प्रकारे अनके उपक्रम राबविण्यात येत आहे.
 याच माध्यमातून गावात  अक्षर भिंती काढलेल्या आहे. प्रवेश केल्याबरोबरच भिंतींवर दिसणारे शैक्षणिक संदेश जणू आपल्याशी संवाद साधत आहेत, असे वाटते.
या अक्षर भिंतींमुळे शैक्षणिक व सामाजिक संदेश लोकांपर्यंत सहज पोहोचताना दिसत आहे. मुलांना विविध संकल्पना सोप्या पद्धतीने समजावून सांगणे शक्य होत आहे. मुले परिसरात खेळत असताना या अक्षर भिंती त्यांच्या सतत नजरेस पडत असल्यामुळे शब्द,अक्षरे व संदेश चिरकाल त्यांच्या लक्षात राहतात. येता–जाता गावकऱ्यांमध्ये या विषयांवर चर्चा व सुसंवाद घडताना दिसून येतो.
या अक्षर भिंतींमध्ये विविध शैक्षणिक व सामाजिक विषयांचा समावेश करण्यात आला आहे. लोकवर्गणीच्या माध्यमातून गावात या अक्षर भिंती साकारण्यात आल्या. या उपक्रमासाठी ग्रामसेवक सौ. वर्षाताई जेजुरकर, सरपंच आत्माराम खताळ, उपसरपंच बाळकृष्ण खताळ, ग्रामपंचायत सदस्य, समस्त गावकरी, शाळेतील शिक्षक तसेच प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या प्रतिनिधी अपर्णा सहारे व सिया लोखंडे यांच्या संयुक्त सहभागातून शिंगवे गावात अक्षर भिंती यशस्वीरीत्या काढण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments