Type Here to Get Search Results !

न्याहारी...... सकाळचे जेवण...... 🌳🌝🌳🌞🌈🌶️🌳🧅🌳

🌳🌝🌳🌞🌈🌶️🌳🧅🌳

सदगुरू रक्षा न्युज :
   🌳🌝🌳🌞🌈🌶️🌳🧅🌳


            न्याहारी
साहित्य प्रकार: ललित लेख
लेखन : विजय शिरसाठ
चाळीसगाव, जि. जळगाव
मो. 8329830887

🌳🌝🌳🌞🌈🌶️🌳🧅🌳
    अजूनही *'न्याहारी'* शब्द नुसता उच्चारला तरी, जीभ पाणी सोडते. काळानुसार 'न्याहारी' शब्दाची रूपे आणि नावे जरी बदलत असली तरी तिचा ग्रामीण बाज आणि चव पाश्चिमात्य संस्कृतीने संकरीत झालेली शहरी ‘ब्रेकफास्ट’ आणि ‘टिफिन’ कधीच हिसकावून घेऊ शकत नाहीत. ‘न्याहारी’ हा तसा बघितला तर सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय! शाळेत जाताना मुल टिफिन विसरून गेलं तर आईच्या जिवाची काहिली होते. जो पर्यंत तो टिफिन मुलापर्यंत पोहचत नाही तोपर्यंत तिचा जीव भांड्यात पडत नाही. कामावर जाणारा कामगार न्याहारी विसरला तर दिवसभर भुकेने कासावीस होतो. *न्याहारीचं एक विशेष, ती आपण कोणासोबत आणि कुठे करतो आहोत, यावरही तिचा स्वाद अवलंबून असतो.*
      या सर्वांमध्ये *शेतात न्याहारी करण्याचा जो आनंद आहे तो स्वादासंबंधी येणाऱ्या सर्व गुणविशेषणांना तुच्छ लेखणारा आहे.* पुर्वीच्या काळी शेतात नेल्या जाणाऱ्या न्याहारीची तऱ्हाच न्यारी होती. ती ब्रेकफास्ट आणि टिफिनच्या या फिस्कटलेल्या जमान्यात लुप्त होऊन गेली. 
       पुर्वाश्रमाची _'न्याहारी'_ म्हणजे, *‘जुना फाटका कपडा मग तो बनियान, परकर असो किंवा अजून अंडरपॅन्ट, त्याला मस्तपैकी हातानेच चौकोनी फाडायचं; याला इकडे खानदेशात अहिराणीत ‘भाते’ म्हणतात. या भात्यावर कळण्याची, बाजरीची किंवा मग दादरची (शाळुची) कडक पोपडा आलेली चुलीवरची गरमागरम भाकर ठेवायची; तिचं वाफाळलेलं कुरकुरीत पोट फाडायचं आणि चटणी (लसणाची, तिळीची, शेंगदाण्याची किंवा मग अजून साधी) भुरभुरवायची किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा पसरवायचा, त्यावर पळीभर घाण्याचं पचपचीत तेल फिरवायचं; तिच्यावर कैरीच्या लोणच्याची चटकदार फोड ठेवायची, आणि मग भाकरीला मधुन दुमडून तिची घडी मारायची; तिला पुन्हा दुमडवायचं आणि चतकोराच्या आकाराची करून ठेवायची; अशी चारही बाजूंनी दुमडून झाल्यावर तिच्या काखेत छोटासा अखंड कांदा निजवायचा; अजून (कुटुंब सधन असेल तर) चिकणीच्या किंवा उडदाच्या पापडाचे तुकडे करून आजुबाजूला ठेवायचे; आणि शेवटी भात्याला चारही बाजूंनी वाळून पक्की गाठ मारायची.* झाली न्याहारी तय्यार. अर्थातच, एवढ्या छोट्याशा ‘व्याख्येत’ न्याहारी मावेल एवढी छोटी ती खचितच नाही. तिचे पंख खूप विस्तिर्ण आहेत. जेवढं कुटुंब सधन तेवढी न्याहारी श्रीमंत; आणि जेवढं कुटुंब गरीब तेवढी ती 'बिच्चारी’.
    चुलीवर भाकरी भाजली आणि तिच्यावर चटणी किंवा ठेचा पसरवला आणि कैरीच्या चिरीची कांद्यासहीत संगत केली म्हणजे शेतावरची न्याहारीला पूर्ण चव येते, असं नाही. ती अजूनही अपूर्णच असते. त्यासाठी तिला शेतात ढगाळलेल्या वातावरणात कळू निंब, बाभूळ किंवा मिळेल त्या झाडाला न्याहारी कुत्रा वगैरे घेऊन जाऊ नये म्हणून बांधावी लागते किंवा मग जमिनीत पुरावी लागते, मग उरलेल्या तीन-चार तासांत गार वाऱ्याचे वा जमिनीचे सात्विक नैसर्गिक सत्व तिला संस्कारित करतात आणि तिला स्वाद बहाल करतात. दोन-तीन तासांत चटणी, तेल, लोणच्यासोबतच खट्याळ वारा एकजीव होऊन आधीच कडक असणाऱ्या भाकरीच्या अंतरंगाचा आरपार ठाव घेतात आणि त्या मुरलेल्या भाकरीला विलक्षण चव बहाल करतात. निसार्गाचं हे गुपित शिकलेल्या व शास्त्रज्ञ झालेल्या माणसाला अजूनही शोधता आलं नाही. निसर्ग म्हणजे जादुच. तो फक्त विल्यम वर्ड्सवर्थ, रॉबर्ट फ्रॉस्ट आणि ना. धो. महानोरांसारख्या दैवी दृष्टी लाभलेल्या कवींनाच सापडला. निसर्गाच्या या अशा जादूविषयी बोलताना रानकवी ना. धो. महानोर म्हणतात, 🌳🌝🌳🌞🌈🌶️🌳🧅🌳
      “कोणती पुण्ये अशी येती फळाला
      जोंधळ्याला चांदणे लखडून जावे “
तेच वाक्य न्याहारीला पण लागू होतं, 
“कोणती जादू अशी धावत येते सेवेला, 
उनाड वाऱ्यानेही न्याहारीला चव द्यावे”
    दोन-तीन तास झाल्यावर मजुरांचा सूर्य (हो, सूर्य मजुरांचाच असतो!) डोक्यावर आला की ‘विना घंट्याचा रेसेस’ होतो. मालकासहीत सर्व न्याहारीला बसतात. न्याहारी वाटून-हिस्सून करतात. एखाद्या 'मजबुराने' नाहीच आणली असेल तर त्यालाही उदार अंतःकरणाने सामावून घेतात. यावेळी न्याहारी जात, धर्म, लिंग, वय, गरिबी आणि श्रीमंती सर्वांची एकत्र होळी करते आणि मनामनात विलीन होते. घरापेक्षा शेतातली न्याहारीची चवच शब्दांत मावणार नाही, एवढी ती गर्विष्ठ! एकत्र केलेली न्याहारी अजून चविष्ट होते आणि तासंतास रक्ताचं पाणी करणाऱ्या मालक-मजुरांना बी. पी., डायबेटिस, हार्ट अटॅक, कॅंसर सारख्या अनेक दुर्धर आजारांपासून लांब ठेवते. ती त्यांचा ‘प्लेसिबो’ बनते. न्याहारी नुसती अन्न नसते, ती असते मेंदूत डोपामिन पैदा करणारी शास्वत फॅक्टरी, अभिजात आनंदाचा ठेवा एकमेव! 
  *_भुक लागल्यावर खाणं याला प्रकृती म्हणतात, पोट भरल्यावरही खाणं याला विकृती म्हणतात, तर आपल्या भाकरीतून दुसऱ्याला चतकोर देणं याला संस्कृती म्हणतात._* न्याहारीला बसल्यावर भाकर-भाजीची देवाणघेवाण ही आपल्याला दातृत्व शिकवते जे संस्कृतीचा फार मोठा ठेवा आहे. एकमेकांना ‘आमची भाजी घ्या’, ‘आमची भाकरी घ्या’, ‘आमचा कांदा घ्या’, ‘आमची चिरी घ्या’, असा आपुलकीचा आग्रह केला जातो. त्यात शहरी ढोंगी औपचारिकता कुठेच नसते, असतो तो निव्वळ ग्रामीण भोळा आपलेपणा.
 🌳🌝🌳🌞🌈🌶️🌳🧅🌳
   *‘न्याहारी’ शेतकरी कुटुंबातील प्रत्येकाचं बालपणही जागवते. मला आजही आठवतं, शेतातून सायंकाळी आईवडील घरी आले की, आम्ही भावंडे शेतातून परत आलेल्या न्याहारीवरून अक्षरशः तुटून पडायचो, आम्ही फार भुकेले असायचो म्हणून नव्हे, तर त्या न्याहारीची चवच आम्हाला अधाशीपणा शिकवायची.* बाजराच्या भाकरीचे तुकडे -तुकडे पडलेले असायचे. त्या तुकड्यांमध्ये चटणी, लोणचे व तेल आरपार मुरलेलं असायचं. त्यामुळे तिला आलेली चव ही जिभेचं पारणं फेडणारी असायची. त्यात लोणच्याची 'फोड' हाती लागली तर मग 'सोने पे सुहागा' असायचा. तिला तोंडातच चाटून-चेपून पूर्ण चोथा  होईपर्यंत खाण्यातला आनंद अजूनही जिभेवर रेंगाळत असतो. मला खात्री आहे, या क्षणाला वाचकाच्या जिभेला पाणी सुटलं असेल. 
     बऱ्याचदा न्याहारीला डब्यात काळ्या मसाल्याची भाजी असायची. ती भाजी पातळ असल्याने तिला डब्यात दिली जायची. म्हणून न्याहारी ऐवजी ‘डबा’ शब्द प्रचलित होता; आजही आहे. ती उरून आलेली भाजी ताटलीत टाकून तिच्यात उरलेली भाकर कुसकरून खाण्यात जो आनंद होता, तो आज पंचतारांकित हॉटेलमध्ये पंचपक्वान्न खातानाही शोधावा लागतो. या भाजीतल्या काळ्या मसाल्याचा एक ग्रामीण रुबाब होता. हा काळा मसाला करताना *‘आई किंवा आजी एक कांदा चुलीच्या जाळमध्ये भाजून घ्यायची, चार-पाच मिरच्या, थोडी हरभऱ्याची डाळ, जिरे, खोबरे, धने, इ. तव्यावर भाजून घ्यायची आणि वरवंट्यावर एकत्र करून पाणी टाकत वाटून घ्यायची आणि या मसाल्याला चुलीवर पातेल्यात गरम केलेल्या तेलात टाकल्यावर संपूर्ण घर आणि प्रसंगी गल्लीसुध्द खमंग वासाने बोलून उठायची'.* या चुलीवरील तेलफुलच्या मसाल्याच्या भाजीसमोर आजही शहरातील मसाल्याची भाजी गरीब वाटते. तिची श्रीमंती आणि रूतबा शहरी भाजी कधीच घेऊ शकत नाही. 
      भाकरी करण्याची जी तऱ्हा होती ती अजून अजबच! कल्हई केलेल्या पितळाच्या भल्यामोठ्या परातीत भाकरी थापली जायची, त्या थापलेल्या भाकरीला हातावर घेऊन चटका न लागू देता तव्यावर टाकली जायची, हे सुद्धा दिव्यच होतं जे फक्त स्त्रीजातीला अवगत होतं. भाकरी तव्यावर टाकल्यावर तिच्यावर लगेच हातात ‘खोंगभर’ पाणी घेऊन तिच्यावर फिरवलं जायचं. ते पाणी तवा व भाकरीवर पडल्यावर चुरचूर आवाज होऊन त्या भाकरीचा सुगंध आजूबाजूला दरवळायचा तो अजून तरी कुठल्या फुलाने चोरलेला दिसत नाही. भाकरी शिजून झाल्यावर तिला तव्यावरून डायरेक्ट ‘दुल्लीत’ (डालकीत) न टाकता आधी तिचा पोपड्याकडील भाग चुलीतील जाळासमोर चुलीला उभा लावला जायचा. याने भाकरीचा पोपडा कुरकुरीत होऊन चवदार व्हायचा. तळ आणि भोपळा कडक असणारी गरमागरम भाकर खाणं म्हणजे…… . ही कुरकुरीत भाकर काळ्या मसाल्याच्या भाजीत काला मोडून लिंबू, कांदा, लोणचे आणि पापड सोबत खाल्ल्यावर आयुष्य वसूल झाल्याची फिलींग यायची. 
      शाळेत असताना मित्रांसोबत केलेल्या न्याहारीचा रंग अजूनच वेगळा. आम्ही साधारण चार-पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या गावातील हायस्कूलला चिखल तुडवत ये-जा करायचो. शनिवार वगळता रोज शाळा दुपारुन असायची. म्हणून रोज सकाळी नऊ-दहाला कच्च-पक्कं खाऊन निघायचो. पण शनिवारी शाळा सकाळी असायची. घरी यायला बारा-एक व्हायचे. त्यातल्या-त्यात काही हातमजुरांचे मुलं परस्पर रोजंदारी असणाऱ्या शेतात जायचे. म्हणून घरचे न्याहारी बांधून द्यायचे. या न्याहारीला पचपचीत तेलातला हिरव्या मिरचीचा ठेचा, कांदा आणि लोणच्याच्या कैरीसोबत पोटाशी मारणारी कळण्याची भाकर, झिंग्याची चटणी, बोंबीलची चटणी, असं काहीमाही 'मैचायल जिभेचं' पारणं फेडणारं असायचं. गाव सूर्यकन्या तापीच्या कुशीत वसलेलं असल्याने झिंगे, मासे, बोंबील हा कॉमन आहार! मला आजही आठवतं दर शनिवारी आमच्या न्याहारीला आमचे इंग्रजीचे सर इ. एन. पाटील आणि चित्रकलेचे एम. जी. चव्हाण सर, कदाचित आम्हाला शोधत, आवर्जून यायचे आणि आमच्या न्याहारीची चव चाखायचे आणि पुढच्या शनिवारी “झिंग्याची चटणी आण हं!” असा आग्रह धरायचे आणि त्या आग्रहापोटी पुढच्या न्याहारीला झिंग्याची चटणी गुलामासारखी हजर असायची. आमचे सर आमचा डबा खातात, या भावनेने आमचीही छाती अभिमानाने फुगायची! 
     *’न्याहारी’ जिची खरी चव आज हरवली आहे; वर्तमानात जिचा ‘प्लेसिबो इफेक्ट’ संपला आहे; जी जात-धर्मात अडकली आहे, जी घर सोडून हॉटेलात रुसून-फुगून बसली आहे, तिचा शोध घेणं गरजेचं आहे!*
🌳🌝🌳🌞🌈🌶️🌳🧅🌳
_'न्याहारी' आवडली असेल तर पुढे जरूर पाठवा, इतरांनाही चव चाखू द्या!_

Post a Comment

1 Comments
  1. न्याहारी छापल्याबद्दल गुरूरक्षा न्यूजचे आभार

    ReplyDelete
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.