चांदवड : परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर माणूस यशाचे शिखर गाठू शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे चांदवड तालुक्यातील शिंगवे गावचे सुपूत्र कै. त्र्यंबक गंगाधर खताळ. एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा ते एक यशस्वी रेल्वे कर्मचारी असा त्यांचा प्रवास २३ एप्रिल २०१५ रोजी अनंतात विलीन झाला, आज त्यांच्या जाण्याला ११ वर्ष पूर्ण होत आहे मात्र त्यांनी मागे सोडलेला संघर्षाचा आणि साधेपणाचा वारसा आजही अनेकांना प्रेरणा देत आहे.
त्र्यंबकराव खताळ यांचे वडील गंगाधरजी खताळ हे एक सामान्य शेतकरी होते. गरिबी पाचवीला पुजलेली असतानाही गंगाधरजींनी 'मानी' स्वभाव आणि आदर्शांशी कधी तडजोड केली नाही. हाच स्वाभिमानी बाणा त्र्यंबकरावांच्या रक्तात होता. याच त्र्यंबक रावांनी"स्वतःच्या संसाराचा गाडा ओढत असतानाच त्यांनी आपल्या तीनही भगिनी, वाळूबाई पंढरीनाथ घुमरे, सिंधुबाई चांगदेवराव गुंड आणि रमा वाल्मीक मढे यांची लग्ने लावून भावाचे कर्तव्य चोख बजावले. गरिबीच्या परिस्थितीतही जिद्दीच्या जोरावर त्यांनी केवळ शेतीच फुलवली नाही, तर नात्यांना प्रेमाचा आणि कर्तव्याचा ओलावा दिला."
वयाच्या कोवळ्या वर्षांपासून गरिबीचे चटके सहन करत असतानाच त्यांच्यातील कलाकाराने जन्म घेतला. मनमाडमधील जयश्री आणि अलंकार टॉकीज मधील विलोभनीय पेंटिंग्स असोत किंवा सामाजिक-राजकीय नेत्यांची हुबेहूब रेखाटलेली चित्रे, त्र्यंबकरावांच्या कुंचल्याने अनेकांना भुरळ घातली.त्यांच्या कुंचल्यातून साकारलेली प्रत्येक कलाकृती त्यांच्या प्रतिभेची साक्ष देत होती.एका बाजूला रेल्वेची नोकरी तर दुसऱ्या बाजूला चित्रकलेसारखी हळवी कला अशा दोन टोकांचा मेळ त्र्यंबक खताळ यांनी आपल्या आयुष्यात घातला वयाच्या २१ व्या वर्षी स्वकर्तृत्वावर रेल्वेची परीक्षा उत्तीर्ण होऊन ते 'पेंटर' पदावर रुजू झाले. सरकारी नोकरी असुनही त्यांनी कधीच मोठेपणाचा आव आणला नाही. आयुष्यभर त्यांनी केवळ सायकलवरूनच प्रवास करणे पसंत केले.सायकल वरून सुरू झालेला हा प्रवास आजही त्यांच्या पुढच्या पिढीसाठी एक मोठा आदर्श असून साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचे ते जिवंत उदाहरण होते. स्वतःच्या संसाराचा गाडा ओढतानाच त्यांनी आपल्या तिन्ही बहिणींची लग्ने लावून भावाचे कर्तव्य चोख बजावले आणि जिद्दीच्या जोरावर आपली शेतीही फुलवली. याचवेळी१९७९ साली नांदगांव येथील - बबनराव सदाशिव आरोटे यांची मुलगी हेमलता हिचेबरोबर लग्नगाठ बांधली यानंतर या अवलिया व्यक्तीने जीवनात मागे वळून बघितलेच नाही. आई व बाप म्हणून आपल्या मुलांवर आणि मुलींवर त्यांनी दिलेले संस्कार आज समाजात लखलखत आहेत. त्यांचे थोरले चिरंजीव संतोष त्र्यंबक खताळ (नाशिक जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी, जय महाराष्ट्र न्यूज) पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत आहेत, तर धाकटे चिरंजीव विशाल त्र्यंबक खताळ वडिलांच्या जागी रेल्वे प्रशासनात उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या दोन्ही मुली सौ.ज्योती दत्तात्रय फटांगरे या अहिल्यानगर येथे आणि सौ.जयश्री सचिन माळोदे ह्या नाशिक येथील सुसंस्कृत घराण्यांत असून वडिलांचा आदर्श जपत आहेत.
एक न भरून निघणारी पोकळी त्यांच्या जीवनात आली ज्यावेळी रिटायरमेंट नंतर हातात पैसे येणार होते त्याचवेळेस निवृत्तीला अवघे चार महिने शिल्लक असताना नियतीने त्यांच्यावर घाला घातला. त्यांच्या निधनाने खताळ कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण शिंगवे गावावर शोककळा पसरली होती. "एका शेतकऱ्याचा मुलगा ते एक यशस्वी बाप" असा त्यांचा प्रवास थांबला असला, तरी त्यांनी जपलेला साधेपणा आणि स्वाभिमान खताळ कुटुंबाच्या रूपाने आजही प्रत्येकाच्या सुख-दुःखात खंबीरपणे उभा आहे.शिंगवे गावातील या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वास आणि शून्यातून विश्व उभे करणाऱ्या 'माणुसकीच्या कलाकारास' भावपूर्ण श्रद्धांजली!
शब्दांकन : सुनिल आण्णा सोनवणे, चांदवड
Post a Comment
0 Comments