Type Here to Get Search Results !

"आता घरच बनणार शाळा... रापली जिल्हा परिषद शाळेत मातांना मिळालं शिक्षणाचं बाळकडू "

सदगुरू रक्षा न्युज प्रतिनिधी चांदवड
​चांदवड (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात मातांची भूमिका महत्त्वाची असते, हा धागा पकडून रापली येथील जिल्हा परिषद शाळेत दि. १९ जानेवारी २०२६ रोजी माता सभेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. प्रथम एज्युकेशन फाउंडेशन आणि डॉ. चंद्रशेखर परदेशी (धोंडगव्हाण) यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच जिल्हा परिषद नाशिक व पंचायत समिती चांदवड यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला. ​सभेच्या प्रारंभी प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे प्रवीण मालसाने व संकेत मालसाने यांनी 'आमचे गाव' या कार्यक्रमाची सविस्तर माहिती मातांना दिली. गावातील मुलांमध्ये नेतृत्वगुण, संवाद कौशल्य आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या 'चिल्ड्रन क्लब' च्या कार्यावर त्यांनी प्रकाश टाकला. शाळेत राबवल्या जाणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांमुळे मुलांच्या प्रगतीला कशी चालना मिळत आहे, हे त्यांनी आवर्जून सांगितले. ​शाळेच्या शिक्षिका गायकवाड मॅडम यांनी माता गटांच्या भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, मातांनी केवळ शालेय शिक्षणावर अवलंबून न राहता घरीही मुलांच्या अभ्यासात सहभाग घ्यावा. त्यांनी खालील मुद्द्यांवर मार्गदर्शन केले: साप्ताहिक व्हिडिओ कार्डच्या आधारे चर्चा करणे.घरातील वस्तूंमधून शैक्षणिक खेळ व जीवनोपयोगी कृती करून घेणे. वर्कशीट्सचा सराव कसा करून घ्यावा, याचे प्रात्यक्षिक मातांना दाखवण्यात आले.या सभेचे विशेष आकर्षण म्हणजे 'प्रथमोपचार' विषयावरील आयडिया व्हिडिओ. दैनंदिन जीवनात मुले किंवा कुटुंबातील सदस्यांना अचानक दुखापत झाल्यास घाबरून न जाता तातडीने कोणती काळजी घ्यावी, याबद्दल मातांना उपयुक्त माहिती देण्यात आली. ​या सभेला मातांचा अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला. "अशा उपक्रमांमुळे मुलांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेबद्दल आमची जागरूकता वाढत आहे," असे मत उपस्थित मातांनी व्यक्त केले. ​याप्रसंगी मुख्याध्यापक वडक्ते सर, शिक्षिका गायकवाड मॅडम, प्रथम फाउंडेशनचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने माता उपस्थित होत्या. सामूहिक प्रयत्नांमुळे ही माता सभा यशस्वीरीत्या संपन्न झाली

Post a Comment

0 Comments