चांदवड : मतदारसंघात शनिवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून सुरू झालेला पाऊस तब्बल अठरा तास चालू राहून रौद्र रूप धारण करत शेतकरी आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले. काढणीला आलेली सोयाबीन, बाजरी, मका, भाजीपाला, कांदा, फळपिके तसेच चारा पिके पाण्याखाली गेली. काही गावांमध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरून संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले तर काही ठिकाणी घरांच्या भिंती कोसळल्या.
या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आमदार डॉ. राहुल दादा आहेर यांनी सोमवारी मतदारसंघातील भुत्याने, हिवरखेडे, दहिवद, दिघवद, कोलटेल व पिंपळद या गावांना भेट देऊन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांना “काळजी करू नका, शासन तुमच्या पाठीशी आहे” असे सांगत धीर दिला.
चालू वर्षी कमी पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याऐवजी अचानक झालेल्या अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले. शेत तळी बनली, ओढे-नाले व नदीला पूर आला, अनेक रस्ते बंद झाले आणि वाहतूक ठप्प झाली. गोदावरी नदीला मोठा विसर्ग झाल्यामुळे नदीकाठच्या गावांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली.
या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. आहेर यांनी संबंधित विभागांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. यावेळी तहसीलदार श्री. मंदार कुलकर्णी, गटविकास अधिकारी श्री. साबळे, कृषी अधिकारी श्री. निलेश मावळे, भाजप अध्यक्ष श्री. मनोज शिंदे, पंचायत समिती सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, कृ.उ.बा.स. संचालक श्री. योगेश ढोमसे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कांदा, सोयाबीन, मका व इतर पिकांच्या पंचनाम्याचे काम महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागामार्फत सुरू आहे.
👉👉👉👉👉👉👉👉👉👉👉👉👉👉👉
दरम्यान, प्रधानमंत्री पिक विमा योजनेत या वर्षी बदल झाले आहेत. नाशिक जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीची निवड झाली आहे. यापुढे पिकाचे नुकसान नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतंत्र तक्रार नोंदवण्याची गरज राहणार नाही, तर महसूल मंडळाच्या पिक कापणी प्रयोगावर आधारित उत्पन्नावर विमा लागू होणार आहे.
कृषी अधिकारी- श्री.निलेश मावळे
Post a Comment
0 Comments