चांदवड – बांगलादेशात हिंदू धर्मियांवर होत असलेले अन्याय, अत्याचार, बलात्काराच्या घटना वारंवार घडत आहे. यामुळे सकल हिंदू धर्मियांच्या भावना तीव्र झाल्या असून बांगलादेशातील या घटना त्वरित थाबावाव्यात अन्यथा भारत सरकारने जश्यास तसे उत्तर द्यावे या मागणीसाठी मंगळवार (दि.१०) रोजी सकल हिंदू धर्मियांच्या वतीने शांततेच्या मार्गाने मूकमोर्चा काढण्यात आला. यावेळी आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येऊन चांदवडचे प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार मंदार कुलकर्णी, पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना निवेदन देण्यात आले.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळी १० वाजेच्या सुमारास सकल हिंदू धर्मीय बांधव जमा झाले होते. यावेळी शांततेच्या मार्गाने हातात भगवे ध्वज, फलक घेत मूकमोर्चा काढण्यात आला. बाजार समिती, बसस्थानक, गणूर चौफुली मार्गे आठवडे बाजार, सोमवार पेठ, राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक व आंबेडकर चौक या ठिकाणी मोर्च्याचा समारोप झाला. यावेळी बांगलादेशात होत असलेल्या हिंदू धर्मियांवरील हल्ले, अत्याचार, लुटमारीच्या घटनांचा निषेध व्यक्त करण्यात आला. बांगलादेशातील हिंदू धर्मियांच्या रक्षणासाठी केंद्र सरकारने पाऊले उचलण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी नाशिक इस्कॉनचे सुकुमार गुरुदास, नादियाकुमार दास, भगवान नरसिंहदास, मदन सदन दास, चंद्रेश्वर गडाचे महंत जयदेवपुरी महाराज, हभप समाधान पगार, हभप सौरव जाधव आदीसह हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोर्चाच्या वतीने प्रमुख मागण्या करण्यात आल्या यात – बांगलादेश पाकिस्तान, श्रीलंका, ब्रम्हदेश, अफगाणीस्तान व जगातील इतर देशात राहणाऱ्या हिंदूंच्या जीविताची जबाबदारी केंद्र सरकारने घ्यावी; जगभरातील सर्व हिंदूंची गणना करावी, चिन्हाकीत करावे त्यांना भारतीय नागरीकत्व द्यावे; सीएए कायद्याची त्वरीत व शिघ्र अमलबजावणी करावी आणि संबंधित हिंदू परीवारांना भारतात सामावून घ्यावे; भारतात हिंदूंना सुरक्षित राहाता यावे म्हणून समान नागरी व एनआरसी कायद्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी.; भारतातील हिंदूंना उद्याच्या भविष्यात परत फाळणीचे दुःख अनुभवावे लागू नये म्हणून आताचा वक्फ बोर्ड अधिनियम निरस्त करावा.; भारतातील 8 राज्यात हिंदू अल्पसंख्यांक झाले आहे त्यांना अल्पसंख्यांकाचे अधिकार द्यावे व त्यांच्या सर्व सुरक्षेची जबाबदारी घ्यावी.; हिंदूंना त्यांचे धार्मिक शिक्षण सरकारी बंधन मुक्त करून ते शिक्षण सर्व हिंदूंना मोफत द्यावे.; पिंपळगाव येथील हिंदू तरुणावर झालेल्या प्राणघात हल्ल्याचा सकल हिंदू समाज जाहीर निषेध करीत असून संबंधित घटनेतील सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक होऊन कठोर शिक्षा करावी.
Post a Comment
0 Comments