चांदवड : पुण्यश्लोक देवी अहिल्या ग्राम विकास संस्था संचलित, महाराणी उषाराजे होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पोलीस दल स्थापना दिन आणि विद्यार्थी सुरक्षा जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आनंद पठारे होते. प्रमुख उपस्थित म्हणून उपनिरीक्षक नानाजी सूर्यवंशी, पोलीस हवालदार प्रदीप आजगे, पोलीस हवालदार भाऊसाहेब गुळे आणि व्ही. एन. कोतवाल वरिष्ठ महाविद्यालयाचे पालकर उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रदीप आजगे यांनी पोलीस दलाच्या कार्याची माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात आनंद पठारे यांनी सद्यस्थितीत वाढत्या सायबर गुन्ह्यांकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, "सध्या सर्वाधिक गुन्हे मोबाईलच्या चुकीच्या वापरामुळे घडत आहेत. विद्यार्थ्यांनी मोबाईल हाताळताना अत्यंत सावधगिरी बाळगावी. संशयास्पद ॲप्स इन्स्टॉल करू नका आणि ऑनलाईन गेमिंगच्या आहारी जाऊ नका, कारण हे व्यसन तुमच्या भविष्यासाठी घातक ठरू शकते."
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन जाधव वस्ती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पाटील यांनी केले. कार्यक्रमाची सांगता विद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वर ठाकरे यांच्या भाषणाने झाली. त्यांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानत विद्यार्थ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायद्याचे ज्ञान आणि स्वतःच्या सुरक्षेबाबत मोठी जागरूकता निर्माण झाली आहे.
Post a Comment
0 Comments